इयता नववी मराठी कुमारभारती _ कवितेचे रसग्रहण

 


इयत्ता ९ वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न २ (ब) हा कवितेच्या रसग्रहणावर आधारित असतो. कृतिपत्रिकेत हा ०४ गुणांचा प्रश्नप्रकार असूनत्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

पठित पदांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कवितांपैकी कोणत्याही दोन कवितांची नावे देऊनत्यांपैकी एका कवितेवर पुढील कृतींना अनुसरून रसग्रहणात्मक प्रश्न विचारला जाईल

(१) कवी / कवयित्रीसंदर्भ (२)प्रस्तुत कवितेचा विषय (३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ (४) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये (५) कवितेतून व्यक्त होणारा विचार (६) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ (७) कवितेतून मिळणारा संदेश (८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 

  कवितेचे रसग्रहण म्हणजे काययातील कृतींचा अभ्यास करण्यासाठी नेमके काय करावेयाबाबत पुढे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

रसग्रहण म्हणजे काय ?

कवितेचा सर्व बाजूंनीपूर्णांगाने आस्वाद घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. कवितेचा छंदप्रकारभाषिक वैशिष्ट्येशब्दकळा आशयाची मांडणीसहजताआवाहकता या घटकांची विस्ताराने मांडणी करणे रसग्रहणात आवश्यक असते. कवितेतील प्रतीके व प्रतिमा उलगडून दाखवणेत्यातील भावसौंदर्यअर्थसौंदर्य समजावून सांगणे हे रसग्रहणात महत्त्वाचे असते. कवितेतून मिळणारी शिकवणसंदेश किंवा मौलिक विचार नेमकेपणाने सांगणेही आवश्यक असते. कवितेतून होणारी रसांची निष्पत्ती व त्याचे ग्रहण (आस्वाद) करणेम्हणजेच कवितेचे सर्वांगाने रसग्रहण होय.

वरील ८ कृतींपैकी कृतिपत्रिकेत १-१ गुणाच्या पहिल्या २ कृती आणि २ गुणांची कोणतीही १ कृती विचारली जाईल.

  •  उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा :

·         कवींचे /कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादीसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.

·         कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.

·         कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

 

कविता : संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री  संत नामदेव.

(२) कवितेचा विषय  या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ  (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)

                   (१) वृक्ष = झाड

                   (२) चित्त = मन

                   (३) निंदा = नालस्ती

                   (४) सम= समान

                  (५) धैर्य = धीर

                  (६) जीव = प्राण.

(४) कवितेतून मिळणारा संदेश  संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये  सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत समक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे. 

(६) कवितेतून व्यक्त होणास विचार  संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :

                निंदास्तुति सम मानिती जे संत ।
                        पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।

निंदा व स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात, असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही..

 (८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

कविता : संतवाणी   (आ) धरिला पंढरीचा चोर.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री संत जनाबाई.

(२) कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ
            (१) बेडी = साखळी

            (२) जीव = प्राण

            (३) पाय = पद

            (४) हृदय = जिव्हार 

(४) कवितेतून मिळणारा संदेश भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये  → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा 'छोटा अभंगाचा लोकछंद प्रकार संत जनाबाईनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत; शिवाय 'सोहं शब्दाचा मारा केला' यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार  श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा आणि त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे आणि त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास, विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ
                " सोहं शब्दाचा मारा केला ।
                  विठ्ठल काकुलती आला ।। '

संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईची व्याकूळ होऊन विनवणी करू लागला.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. 'प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही, या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

कविता - या झोपडीत माझ्या

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.

(२) कवितेचा विषय अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते, याचे निवेदन या कवितेत केले आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ
                (१) सौख्य सुख
                   (२) भूमी = जमीन
                  (३) नाम = नाव
                  (४) मज्जाव = मनाई
                  (५) भीती = भय
                  (६) मऊ == नरम
                  (७) बोजा = वजन, भार
                  (८) सदा == सतत.

(४) कवितेतून मिळणारा संदेश श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये, जे प्राप्त परिस्थितीत मिळते, ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते, ही शिकवण मिळते.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा 'ओवी' हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – 'या झोपडीत माझ्या' असा केल्याने आशयाची घनता वाढते.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली, तर मानसिक सुख लाभते.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
        पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
          शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे माहात्म्य सांगताना म्हणतात- झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते. 

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  राजालाही जी सुखे मिळत नाहीत, ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना मानाने, सुखासमाधानाने जगावे, हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

कविता - मी वाचवतोय.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री सतीश काळसेकर.

(२) कवितेचा विषय वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ
               (
) हाक = साद
             (२) आई = माता
             (३) विस्तव = आग
              (४) राख = रक्षा
             (५) वारा = वात.

(४) कवितेतून मिळणारा संदेश चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
              
हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

 बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये मम्मी-डॅडी या परकीय शब्दांमुळे आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी व कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous Post Next Post