रस ( Ras) (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा
भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या
कलांचा समावेश होतो. रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य
आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. भारतीय
साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित
विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ
स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा
स्थायी सांगितला आहे.
प्रत्येक माणसाच्या अंत:करणात प्रेम, दुख, राग, भय इत्यादी कमी-अधिक प्रमाणात असणाऱ्या शाश्वत व स्थिर भावनांना स्थायीभाव म्हणतात.
अंतःकरणातील या भावना जागृत होतात तेव्हा तो रस निर्माण झाला असे
समजावे.
रस : एकूण ९ रस
(१) शृंगार, (२) वीर , (३) करूण,
(४)
रौद्र (५) हास्य, (६) भयानक, (७) बीभत्स ,
(८)
अदभुत, (९)शांत
विभाव : प्रेम, राग,
दुःख
इत्यादी स्थायीभाव ज्यांच्यामुळे उद्दीपित होतात त्यांना विभाव असे म्हणतात.
उदा.
चांदण्यात प्रेम तर एकांतात दुःखी म्हणून चांदणे, एकांत हे विभाव
होत.
अनुभाव : स्थायीभावामुळे
रडू येणे, घाम फुटणे, रोमांच उभे राहणे हे जे परिणाम दिसून
येतात त्यांना अनुभाव म्हणतात.
१] शृंगार रस म्हणजे काय?
शृंगार : स्त्रीपुरुषांना
एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची
निर्मिती होते. (शृंग म्हणजे कामवासना)
उदा. (1) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग
(2) सहज
सख्या एकदाच येई सांजवेळी
(3) काढ सख्ये
गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
(4) डोळे हे जुलमी
गडे रोखुनि मज पाहू नका
२] वीर रस म्हणजे काय ?
वीर रस : 'उत्साह' हा या रसाचा स्थायीभाव. शौर्य, पराक्रम,
धीरोदत्त
प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो,
उदा. (1) उठा राष्ट्र वीर
हो, सुसज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला
(2) गर्जा जयजयकार
क्रांतीचा गर्जा जयकार
(3) जिंकू किंवा मरू,
माणुसकीच्या
शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु.
३] करुण रस
म्हणजे काय ?
करूण : शोक' हा
या रसाचा स्थायीभाव ;
दुःख किंवा शोक,
वियोग,
संकट
यातून हा रस निर्माण होतो. दुःख हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनात हा रस
आढळतो.
उदा. (1) क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी
चुके पथहि येऊनी स्तिमित दृष्टिला
झापडी,
(2) शर आला तो
धावुनि आला काळ विव्हळला श्रावणबाळ
(3) हे कोण बोलले
बोला? राजहंस माझा निजला !
(4) आई म्हणोनि कोणी
आईस हाक मारी
(5) पोर खाटेवर
मृत्युच्याच दारा, कुणा गरिबाचा तळमळे बिचारा.
४] हास्य रस
म्हणजे काय ?
हास्य: विसंगती, असंबद्ध भाषण,
विडंबन,
व्यंगदर्शन,
चेष्टा
यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो.
उदा. (1) बोक्याने काढले एक दुकान
पण मिळतात फक्त उंदराचे कान ।
(2) म्हशीन खाल्ली
गवताची पेंढी
नारळाच्या टाळक्यावर उगवली शेंडी
(3) दिल्ली मधल्या
माणसाचे नाक इतके लांब
की शेंडा हलवून मद्रासच्या मुलास
म्हणतो थांब
(4) परटा येशील का
परतून ? (झेंडुची फुले)
५] रौद्र रस
म्हणजे काय ?
रौद्र : 'क्रोध' हा
या रसाचा स्थायीभाव, अतिशय क्रोध व चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो.
उदा. (1) वर भिवई चढली दांत दाबती ओठं
छातीवर तुटली पटबंदाची गांठ
म्यानातुन उसळे तलवारीची पात
(2) खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे
चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !
(3) पाड सिंहासने ओढ दुष्ट ती पालथी
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
(4) असेल हिंमत लढणारांची आणि सुळावर
चढणारांची
निर्भय निधड्या छातीवरती जुलुम रगडीत
जाणारांची त्यांनी यावे ।
६] भयानक रस
म्हणजे काय ?
भयानक : 'भीती' हा या रसाचा
स्थायीभाव;
युद्ध,
मृत्यू,
सूड,
राक्षस,
स्मशान
इत्यादींच्या वर्णनातून हा रस आढळतो.
उदा. (1) त्या उजाड माळावरती, बुरजाच्या पडक्या भिंती
(2) शिशिर ऋतुची थंडी फिरकू दे ना कुणास
बाहेर
काळोख्या रजनी विश्व जहाले भयाण माहेर
७] बीभत्स रस
म्हणजे काय ?
बीभत्स : 'घृणा' हा या रसाचा
स्थायीभाव, किळस, वीट, तिटकारा वर्णन करणाऱ्या कवितांतून व वर्णनांतून हा रस आढळते.
उदा. (1) हे बोटे चघळीत काय बसले हे राम रे लाळ ही ।
८] अद्भुत रस
म्हणजे काय ?
अद्भुत : 'विस्मय' हा या रसाचा
स्थायीभाव,
पऱ्याच्या कथा,
जादूचा
दिवा, अरेबियन नाईट्स इत्यादी आश्चर्यकारक गोष्टीतून हा रस आढळतो.
उदा. (1) किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी
(2) आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या
काठी पेढयांच मळे
नगरातील लोक सारेच वेडे, बेडयांनी बांधलेले बर्फीचे वाडे.
९] शांत रस
म्हणजे काय ?
शांत : ईश्वरभक्ती,
सत्पुरुष
संग, देवालय, प्रार्थना स्थळे यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस
निर्माण होतो. भुपाळ्या, प्रार्थना, अंगाईगीतांतून
शांतरसाचा प्रत्यय येतो.
उदा. (1) घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. (भुपाळी)
(2) निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा
(अंगाईगीत)
(4) सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना (प्रार्थना)
(5) आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञ
तोषावे (पसायदान)
(6) पक्षीजाय दिगंबरा । बाळकाशी आणी चारा ||
(अभंग)