लेखन कौशल्य : कथा लेखन _ katha lekhan in marathi



 'कथालेखन' ही एक कला आहे. ती सरावानेच आत्मसात होते. कथेतून आनंद मिळतो, विचारांना दिशा मिळते. कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलता यांच्या बळावर कथा रचली जाते. कथा ही पूर्णतः काल्पनिक किंवा सत्यघटनेवर आधारलेली असू शकते.कथाबीज हा कथेचा प्राण असतो आणि या कथाबीजावरच कथानक उभारले जाते. हे कथानक भूतकाळात घडलेल्या घटनांचे प्रसंगांचे असते. या घटना, प्रसंग, पात्र तर्कसंगत विचारांनी फुलवणे हे लेखनकौशल्य आहे. कथालेखनाचे कौशल्य विकसित व्हावे हा या घटकाच्या अभ्यासामागचा हेतू आहे.


उपयोजित लेखनप्रकारामध्ये 'कथालेखन' हा घटक विदयार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे. कल्पना, नवनिर्मिती,स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतील. 

कथाबीजानुसार कथाचे विविध प्रकार पडतात.

उदा.

(१) शौर्यकथा

(२) विज्ञान कथा

(३) बोधकथा

(४) ऐतिहासिक कथा

(५) रूपककथा

(६) विनोदीकथा इत्यादी.


खालील मुद्द्यांच्याआधारे कथालेखन करावे.


शीर्षक

कथालेखन 

पात्रांचे स्वभाव विशेष

कथाबीज

पात्रांमधील संवाद

कथेची सुरुवात

विषयाला अनुसरून भाषा

कथेतील घटना व स्थळ

कथेचा शेवट

कथेतील पात्रे

तात्पर्य(कथेतून मिळालेला बोध, संदेश, मूल्य)


खालील मुद्द्याचा सविस्तर विचार करूया.

(१) कथाबीज  : 

कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलवावे.

(२) कथेची रचना :

लांबन कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. कथेची सुरुवात आकर्षक असावी. वाक्यांची रचना पाल्हाळिक नसावी. आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये असावी. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. कथा नेहमी भूतकाळातच लिहावी.

(३) कथेतील घटना व पात्रे :

कथाबीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. जे कथाबीजाला पुढे नेऊ शकतील. घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे, पात्र, घटना व स्थळाच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. वर्णन चित्रदर्शी असावे.

(४) पात्रांचे स्वभाव विशेष :

कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनांचे वर्णन करावे.

उदा., राग आला तर त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या इत्यादी. 

(५) कथेतील संवाद व भाषा : 

कथेत निवडलेल्या परिसराला कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. आलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. संवादाची परिणामकारकता बिरामचिन्हांमुळे निर्माण होते. पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा.

(६) शीर्षक तात्पर्य :

संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य / संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. कथेतून मिळणारा संदेश / मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंधित करणारे तात्पर्य असावे. 

कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या सृजनशील कल्पनेला खूप घुमारे असतात. त्यांना फक्त निरीक्षण व कल्पकतेने अभिव्यक्त करा.

कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती

  1. कथाबीजावरून कथालेखन
  2. दिलेल्या शीर्षकावरून कथालेखन
  3. मुद्द्यांवरून कथालेखन
  4. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन
  5. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे.

  • कथालेखन करताना घ्यावयाची काळजी
  • कथेसाठी दिलेला विषय समजावून घ्यावा.
  • कथेसाठी दिलेले शब्द, मुद्दे, विषय, पूर्वार्ध, उत्तरार्ध काळजीपूर्वक वाचा व अर्थ समजावून घ्यावा.
  • कथालेखन करताना आकर्षक सुरूवात, माहीती पूर्ण मध्य, सकारात्मक शेवट असा क्रम असावा.
  • कथालेखन करताना भाषा, घटना, कालानुक्रम, पात्र, संवाद, प्रसंग यांमध्ये सुसूत्रता असावी.
  • कथेची उत्सुकता शेवटपर्यंत टिकावी. ओघवती लेखन शैली असावी.
  • कथेची भाषा साधी व सुटसुटीत असावी.
  • कथा भूतकाळात लिहावी.
  • कथेला शीर्षक द्यावा. (तात्पर्य लिहीण्याची आवश्यकता नाही )


नमुना कथा -1

मुद्दे :
एक गाव - तळे- मुंगी पाण्यात पडणे कबूतराने पान टाकणे - मुंगीचे प्राण वाचवणे - शिकारी येणे- कबूतरावर बंदुकीचा नेम - मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला चावा घेणे - नेम चुकणे बंदुकीच्या आवाजाने कबूतर उडणे-मुंगी व कबूतर मैत्री.] 

   एकमेकां साह्य करू
   एका गावात एक सुंदर तळे होते. तळ्याच्या काठावर एक झाड होते. त्या झाडावर एक कबूतर बसले होते. ते तळ्याच्या पाण्याकडे बराच वेळ टक लावून पाहत होते. त्याला त्या पाण्यात पडलेली एक मुंगी दिसली. ती मुंगी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होती; पण तिला ते जमत नव्हते. ते कबूतर मुंगीची ही धडपड पाहत होते. 
    कबुतराच्या मनात एक विचार आला. त्याने त्या झाडाचे एक पान तोडले आणि पाण्यात मुंगीच्या जवळ टाकले. बुडणारी मुंगी त्या पानावर चढली. पाण्यातील तरंगांमुळे ते पान तळ्याच्या काठापर्यंत आले. मुंगी जमिनीवर उतरली. तिने झाडावरच्या कबुतराकडे पाहिले आणि त्याचे मनोमन आभार मानले. 
    काही दिवसांनंतर ती मुंगी जमिनीवर आपले खादय शोधण्यासाठी फिरत होती. कबूतर नेहमीप्रमाणे झाडाच्या फांदीवर डोळे मिटून आराम करीत होते. त्याचवेळी तेथे एक शिकारी आला होता. शिकाऱ्याने त्या कबुतराला पाहताच त्याच्यावर बंदूक रोखली. आता त्या बंदुकीतून गोळी सुटली तर कबुतराचा जीव जाईल, हे त्या मुंगीने जाणले. त्याच क्षणी ती शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली.
          मुंगीच्या चाव्यामुळे शिकाऱ्याचा बंदुकीवरील हात हलला. गोळी उडाली; पण गोळी भलत्याच दिशेला गेली. बंदुकीच्या आवाजाने कबूतर भानावर आले. ते उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. मुंगीमुळेच आज आपला जीव वाचला हे कबुतराच्या लक्षात आले. त्याने मुंगीचे आभार मानले. तेव्हापासून त्या कबुतराची आणि मुंगीची पक्की मैत्री जमली. 

तात्पर्य : उपकाराची फेड उपकाराने करावी.


नमुना कथा -2

मुद्दे : 

[शेखर हा एक छोटा मुलगा - आपल्या वृद्ध आजीसह झोपडीत राहत होता - पावसाचे दिवस - वादळासह जोराचा पाऊस - फिशप्लेटस् काढलेला राहत होता शेखरच्या नजरेने टिपलेला धोका - आगगाडी येण्याची वेळ - शेखर लाल सदरा फडकवत रेल्वेरुळावर उभा - आगगाडी थांबली - ड्रायव्हरच्या लक्षात आलेला धोका - शेखरमुळे प्रवाशांने प्राण वाचले - राष्ट्रपतीकडून शेखरला सुवर्णपदक.] 

प्रसंगावधानाचे बक्षीस 

    शेखर हा एक अत्यंत गरीब मुलगा होता. रेल्वेच्या कडेला झोपडपट्टीत आपल्या आजीसह तो राहत होता. आजी थकली होती, तरी चार-पाच घरची धुणी-भांडी करून ती दोघांचे पोट भरत असे. दहा वर्षांचा शेखर आपला अभ्यास सांभाळून लहानमोठी कामेही करत असे. 

    त्या दिवशी तर धो धो पाऊस कोसळत होता. संध्याकाळचे एका घरचे काम आटोपून शेखर घराकडे जात होता. उशीर झाल्यामुळे शेखर रेल्वेरुळांलगतच्या वाटेने परतत होता. झपझप चालताना रुळाच्या फिशप्लेटस् काढल्या असल्याचे शेखरला दिसले. शेखर चमकला. आता जर रुळावरून गाडी गेली, तर ती नक्कीच घसरणार आणि मोठा अपघात होणार, हे शेखरने ओळखले. काय करावे? क्षणभर शेखरला काहीही उमगेना ! शेखरला माहीत होते की, आता थोड्याच वेळात एक मालगाडी येणार आहे. आता हा अपघात कसा टाळावा, हे शेखरला उमगेना. पण क्षणार्धात शेखरला युक्ती सुचली. 

    त्याने आपल्या अंगातला लाल सदरा काढला, त्याचे दोन तुकडे केले आणि दोन हातांत दोन लाल तुकडे घेऊन तो गाडीच्या दिशेने रुळांमधून धावत सुटला. आता वेळ अगदी थोडा उरला होता. शेखरला गाडीचा आवाज येत होता. तो वेगाने धावत होता. गाडी त्याच्या दृष्टिक्षेपात आली होती, ड्रायव्हरला शेखर दिसला आणि मोठ्या प्रयत्नाने त्याने गाडी थांबवली. गाडीचा ड्रायव्हर खाली उतरला. धापा टाकणाऱ्या शेखरचे म्हणणे ड्रायव्हरने लक्षपूर्वक ऐकले. मग ड्रायव्हर आणि काही मंडळी शेखरबरोबर फिशप्लेटस् काढलेल्या जागी आली आणि ते दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना शेखरच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. ड्रायव्हरने शेखरचे नाव, पत्ता लिहून घेतला आणि त्या प्रसंगाची हकिकत त्याने आपल्या अधिकाऱ्यांना कळवली.

   शेखरच्या सत्कार्याची माहिती राष्ट्रपतींना कळवण्यात आली. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते शेखरचा सत्कार करण्यात आला. 

तात्पर्य : संकटामध्ये प्रसंगावधान महत्त्वाचे ठरते.


नमुना कथा -3

मुद्दे : 

[जेम्स नावाचा लहान मुलगा शेगडीवर चहाची किटली-- किटलीचे झाकण थडथडणे झाकण वर उचलले गेल्यावर वाफ बाहेर पडणे व झाकण खाली येणे - वारंवार असेच घडणे --अखेर वाफेच्या जोराने झाकण खाली पडणे ---आश्चर्य वाफेत मोठी शक्ती असली पाहिजे या शक्तीचा उपयोग होईल -- वाफेचे यंत्र तयार केले जेम्स वॅट महान संशोधक.] 

चहाची किटली ते वाफेचे इंजिन 

    त्या दिवशी कडाक्याची थंडी होती. स्वयंपाकघरातील शेगडीपाशी छोटा जेम्स उबेसाठी बसला होता. त्याच्या आईने शेगडीवर चहाची किटली ठेवलेली होती. जेम्स त्या किटलीकडे पाहत बसला होता. त्याला प्रत्येक गोष्ट निरखून पाहण्याची सवय होती. 

   जेम्सच्या लक्षात आले की, किटलीचे झाकण थडथडत आहे. त्याने निरखून पाहिले, पाण्याची वाफ जसजशी वाढत होती, तसतसे त्या झाकणाचे थडथडणे वाढत होते. त्यामुळे झाकण वर उचलले जाई व थोडी वाफ बाहेर पडल्यावर झाकण खाली येई. असे वारंवार घडत होते. 

    जेम्स पाहत होता, काही वेळाने वाफ खूपच वाढली आणि वाफेच्या जोराने किटलीचे झाकण खाली पडले. जेम्सला मोठे आश्चर्य वाटले. त्याच वेळी जेम्सने एक महत्त्वाची गोष्ट मनात नोंदवली. ती म्हणजे, 'वाफेत मोठी शक्ती असली पाहिजे.' मग जेम्स विचार करू लागला, 'या शक्तीचा कसा उपयोग करता येईल?' 

     पुढे अनेक वर्षांनंतर जेम्सने वाफेवर चालणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले. जेम्सने अनेक वेळा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नात त्याला काही यश येत नव्हते. तरीपण त्याने आपले प्रयत्न थांबवले नाहीत. अखेर एक दिवस त्याला त्यात यश मिळाले. त्याने 'वाफेचे इंजिन' तयार केले. त्या वाफेच्या इंजिनावर आगगाडी धावू लागली. हा छोटा जेम्स म्हणजे पुढे महान संशोधक झालेला जेम्स वॅट होय. 

तात्पर्य : जिज्ञासा ही शोधाची जननी आहे.


नमुना कथा -4

मुद्दे :
[एक कोल्हा -- खूप भूक लागते- -शेतकऱ्याच्या घराजवळ द्राक्षाची बाग--द्राक्षे खाण्याची इच्छा द्राक्षांची वेल उंच उड्या मारतो -- हाताला लागत नाहीत -- थकतो -- आंबट द्राक्षे मला नकोत निघून जातो.]

 कोल्हह्याला द्राक्षे आंबट ! 

    एका रानात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी सकाळी सकाळी त्याला खूप भूक लागली. 'आता मी काय बरे खाऊ?' असा त्याला प्रश्न पडला. मग तो भक्ष्य शोधण्यासाठी हिंडू लागला; पण त्याला कोणताही प्राणी सापडला नाही. त्याची सर्व वणवण व्यर्थ गेली. तो खूप थकला होता. 

   त्याने ठरवले की, आपण आता गावापाशी जावे, तेथे आपल्याला काही तरी खायला मिळेल. गावात एका शेतकऱ्याच्या घराजवळ त्याला एक लठ्ठ कोंबडी दिसली. कोंबडी पाहून तो खूश झाला. तो कोंबडीला धरणार तोच त्या शेतकऱ्याचा शिकारी कुत्रा त्याच्यावर धावून आला. कुत्र्याला पाहून घाबरलेल्या कोल्हयाने धूम ठोकली. 

   कोल्हयाच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. इतक्यात त्याला पिकलेल्या द्राक्षांच्या वेली असलेली एक बाग दिसली. ती द्राक्षे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. पोटभर द्राक्षे खाण्याच्या विचाराने तो त्या द्राक्षांच्या बागेत घुसला. 

   बागेत वेलींवर द्राक्षाचे घड लोंबत होते. कोल्हह्याने द्राक्षे मिळवण्यासाठी उडी मारली; पण त्याची उडी द्राक्षांच्या घडापर्यंत पोचू शकली नाही. त्याने पुनःपुन्हा उड्या मारल्या; पण उंचावरची ती द्राक्षे त्याच्या हाती लागली नाहीत. उड्या मारून मारून त्याची छाती दुखू लागली. 

   शेवटी त्याची आठवी उडीही फुकट गेली. तेव्हा "ही द्राक्षे आंबट आहेत. ही मला नकोच," असे म्हणून कोल्हा रागारागाने तेथून निघून गेला. 

तात्पर्य : नाचता येईना अंगण वाकडे !



खालील शब्दांच्या आधारे कथा तयार करा.

• धैर्य -- धाडस -- स्वाभिमान -- देशभक्ती

• मृणाली -- गावातील स्त्रीया -- नदी -- पूर -- उडी --  प्राण वाचवणे -- कौतुक

• राजा -- लाडका हत्ती -- म्हतारा --  चिखल -- बाहेर

• कोंबडी -- सोन्याचे अंडे -- पैसा -- लोभ -- अधिक अंडे मिळवणे -- मृत्यू

• टोपी विकणे -- जंगलप्रवास -- दूपार -- माकडे -- टोप्या फेकणे -- आनंद


थोडे नवीन जरा जुने